माझे बाबा,
हरिहर भाऊराव अलोणी ३०.३.१९३३ ला अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला, पाटणसावंगी, सावनेर अश्या त्याकाळच्या खेड्यात एकत्र कुटुंबात आयुष्याची सुरुवात होत असताना वयाच्या अजाणत्या वयात आईचे छत्र हरवले. १९५३ मध्ये नागपूरला मध्य रेल्वे मध्ये मालगाडी गार्ड या पदावर रुजू झाले, त्यावेळी आतेभावाच्या मुलांची शिक्षणं आणि स्वतःची नोकरी सांभाळत मजल दरमजल करीत अक्षरशः हलाखीचे दिवस बघितले. गार्डच्या नोकरी मध्ये पण अत्यंत खडतर प्रवास, आमला-बल्लारशहा-नागपूर अशी शिफ्ट ड्युटी. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना १९६८ मध्ये लग्न झाले. माझी आई कुसुम नरसिंह पोतदार ची सौ स्नेहलता हरिहर अलोणी झाली. आई पण शिक्षिका त्यामुळे दोघांनी आमच्या एकत्र कुटुंबाचे सर्व सणवार सांभाळत सगळ्या घरावर संस्कार केले. माझा जन्म १९७१ मध्ये झाला, काहीच दिवसात आम्ही झेंडा चौक महालला राहायला आलो, तिथूनच माझे शालेय शिक्षण सुरू झाले, त्याकाळातच माझ्या बाबांची नागपूर डीआरएम कार्यालयात बदली झाली आणि ऑपरेटिंग डिपार्टमेंट मधून सेवानिवृत्त झाले.
जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून मी त्यांच्या नजरेत भेदकता आणि आवाजात करारीपणा अनुभवला. साधारणत: आमच्या अलोणी कुटुंबातले जवळपास सगळेच टरकून असायचे. माझे सख्खेचुलत भाऊ सतीश, संजय, मिलिंद, नितीन, बहीण लता आणि हर्षा यांनी माझ्यासोबत कित्येकदा बाबांच्या शिस्तीचा धाक अनुभवला. सगळ्यांना त्यांच्या बद्दल एक आदरयुक्त भीती ही असायचीच. मी तर कायम त्यांच्या धाकातच वाढलो, प्रसंगी मार हि खाल्ला, पण माझे कोडकौतुक करताना त्यांनी त्याही परिस्थितीत कधीही हाथ आखडता घेतला नाही. मला कायम आठवते की दोन आकडी पगार असताना देखील केवळ मला कबूल केले होते म्हणून मला स्कॉलरशिप मिळाली तेव्हा माझ्यासाठी खास मुंबईवरून तीन आकडी किमतीचा कॅरमबोर्ड आणून दिला. आमच्या महालच्या घरात एकत्र कुटुंबाचे सगळे सण म्हणजे आम्हा सगळ्यांना पर्वणी असायची. माझे सख्खेचूलत, मामेभाऊ आणि बहिणी, प्रशांत, राहुल, रवी, दीपाली आणि मीनल ह्यांचे सोबत दिवाळीचे फटाके आणि फराळ अगदी सगळ्या वेळी माझे बाबा भक्कमपणे आमच्या सगळ्यांच्या मागे असायचे.
एक एक रूपया जमवून माझ्या आईबाबांनी सुरेंद्रनगरला प्लॉट घेतला आणि त्यावर घर बांधले. नाव पण अगदी समर्पक “विसावा” अगदी नावाप्रमाणे सगळ्यांना विसाव्याचे स्थानच जणू. माझे शालेय शिक्षण पूर्ण करून आम्ही नवीन घरी राहायला आलो. माझे पदवी शिक्षण पूर्ण होतानाच आईबाबा दोघेही सेवानिवृत्त झाले होते. माझ्या आयुष्यात माझे आईबाबा अगदी ढाल आणि तलवार सारखेच होते, प्रसंगानुरूप दोघेही आपली भूमिका घ्यायचे आणि कधी अदलाबदल करायचे, कधीही आणि कुठेही मला कमी पडू दिले नाही. वेळच्या वेळी सायकल, मग पुढे स्कुटर आणि कार घेताना कधीही मागेपुढे पाहिले नाही. मध्य रेल्वेच्या नोकरीत असल्याने पास मिळायचा आणि मग कित्येकदा मुंबईची ट्रिप व्हायचीच. मुंबईला माझे आजोबा तीर्थस्वरूप हरदास काकांकडे हक्काने मुक्कामी राहून संपूर्ण मुंबई दर्शन करायचे हा नेहमीचा नियम होता. हरदास काकांच्या महासागर गणेश मंदिरात आरतीला नेमाने हजर राहणे हा मुंबई वास्तव्यात नित्यनियम राहायचा. तिथून बदलापूर ला दत्तुमामा कडे आणि नरहरी भाऊ कडे जायचेच.
सेवानिवृत्त झाल्यावर सर्वप्रथम माझे बाबा आमच्या सेंट्रल रेल्वे को-ऑप हौसिंग सोसायटीचे सचिव म्हणून निवडून आले. तीन वर्षे संपूर्ण सचोटीने सोसायटीचा कारभार केला. त्यादरम्यान मी विज्ञानाची पदवी पूर्ण केली. त्यावेळी नोकरी करण्यापेक्षा अजून शिकून घे म्हणून मला विधी महाविद्यालयात टाकले आणि विधी पदवी पूर्ण केली त्यात पण त्यांचाच पुढाकार. १९९९ ला माझे लग्न झाले, माझ्या लग्नात देखील रात्री वरात ते ही बँड आणि बग्गी मध्ये काढून सुनेचा गृहप्रवेश थाटात केला, स्वागत समारंभ अगदी धडाक्यात केला, कल्याणी सहचारिणी झाली आणि तिच्यासोबत संसार सुरू झाला. कल्याणीला पण घरात त्यांचा दरारा अनुभवायला मिळाला. कदाचित काही मनासारख्या गोष्टी करता आल्या नसतील पण तिचा तिने कधी बभ्रा केला नाही, हा हि तिच्या त्यांच्यापोटी आदरभाव असणार. काहीच वर्षात मी दिवाणी न्यायाधीश म्हणून चंद्रपूर ला नोकरीला लागलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, तेज आणि एक अभिमान मी बघितला आहे. वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत आईबाबांच्या छत्राखाली राहणारा मुलगा पहिल्यांदा घराबाहेर नोकरीनिमित्त निघताना त्यांच्या भावनांवर ताबा ठेवून मला मारलेली मिठी ही अजून जाणवते. मला बसवर सोडायला आले तेव्हा त्यांच्या मनातली चलबिचल मला कधीही जाणवू दिली नाही. २००२ मध्ये अनयचा जन्म झाला तेव्हा आजोबा-आजी नातवाच्या दंग्यात आणि कौतुकात समरस व्हायचे. तेव्हा मला जाणवायचे की ज्या गोष्टी माझ्यासाठी वर्ज्य होत्या त्याबाबत अनयला मुभा होती, अनयचे कोडकौतुक व्हायचे आणि मला आईबाबांमधला बदल जाणवायला लागला. माझ्या दोन्ही भावजया नेहमीच म्हणायच्या “बाबाकाका तुम्ही आता खूप बदलले आता नातू इतका मस्ती करतो पण तुम्ही एकदाही त्याला समज देत नाही”.
चंद्रपूर, वरोरा आणि साकोली येथे माझ्या वास्तव्यात आईबाबा माझ्या सोबत अधूनमधून राहायला यायचे. आपला मुलगा न्यायाधीशाच्या खुर्चीत कसा दिसतो हे बघायला माझे आईबाबा आवर्जून चंद्रपूर, वरोरा आणि साकोली ला आले. त्यांनी कायम माझ्यासोबत राहावे ही माझी इच्छा असताना देखील माझ्या संसाराला त्यांनी नेहमीच मोकळेपण दिले. कल्याणीने प्रत्येक सणाला नागपूरला यायचे अशी त्यांची इच्छा कायम असायची आणि कल्याणीने पण त्या इच्छेचा मान कायम राखला. २००६ ला मी नागपूरला बदलीवर आलो पण माझ्या आईसोबत राहण्याची इच्छा केवळ तीन महिनेपर्यंतच राहिली. १९ सप्टेंबर २००६ ला आईचे अचानक निघून जाणे सगळ्यांना लागले होते. सहचारिणीचे असे अवकाळी निघून जाणे माझ्या बाबांना खूप जिव्हारी लागले त्याही परिस्थितीत माझे बाबा माझ्या आणि कल्याणीच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. २००८ मध्ये अद्वयचा जन्म झाला तेव्हा त्यांना आभाळ ठेंगणे झाले होते. अनय आणि अद्वय चे सगळे वाढदिवस आणि त्यांच्या मुंजी पण थाटात केल्या. अनयची आणि अद्वयची मुंज अगदी धुमधडाक्यात केली त्यांच्याही वरातीत फेर धरून नाचताना त्यांना बघताना उर भरून यायचा. त्यांच्याच पठडीत तयार होताना मला माझ्यातले वेगळेपण जाणवत होते. त्यांचा सहस्त्रचंद्रयाग केला तेव्हा ५ ही सुनांनी त्यांना ८० निरंजनांनी ओवाळले तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते संपूर्णतेचा एक भाव त्यांच्या मुखावर होता.
मे २००९ मध्ये माझ्या बदलीचे दिवस होते, परंतु मला बदलीच्या जागी जाण्यात स्वारस्य उरले नव्हते, बाबा कायम माझा उत्कर्षसाठी काहीही त्याग करायला तयार होते पण त्यांचा नागपूरचा मित्रपरिवार नातेवाईक सोडून माझ्यासोबत बदलीच्या नोकरीत महाराष्ट्र दर्शन करायला तयार होईनात. ते नेहमी म्हणायचे, "मी एका टेबलवर चार प्रमोशन्स घेतली आता कुठे तुझ्या मागे मागे फिरू". एक मुलगा आणि एक न्यायिक अधिकारी यांच्यातले द्वंद्वयुद्ध शेवटी सुदैवाने एका मुलाने जिंकले. माझा नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांना कधी रुजलाच नाही. त्यानंतर वकिली सुरू केल्यावर पहिल्या केस मध्ये माझ्या विरुद्ध निर्णय लागल्याचा त्यांना खूप राग आणि अतीव दुःख झाले होते. आपल्या मुलाने अपयश बघूच नये हा कायम अट्टाहास त्यांचा राहिला. महतप्रयासाने शेवटी अनय आणि अद्वय यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी त्यांनी माझ्या निर्णयाला अनिच्छेने का असो दुजोरा दिला. माझ्या निर्णयामुळे आज दोघेही मुले छान शाळा कॉलेजात शिक्षण घेत आहे याचे त्यांना मनस्वी कौतुक होते.
कल्याणीने जरी त्यांच्या निग्रहाचा अनुभव घेतला असला तरी आईबाबांनी तिचे सगळे सणवार, कोडकौतुक अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले याची पण जाणीव तिला आहे. कल्याणीने देखील माझी आई गेल्यावर आमच्या कुटुंबाचा डोलारा अगदी मनाने, आनंदाने आणि जिद्दीने सांभाळला. मला माझ्या बाबांचे प्रेम हळूहळू उलगडत गेले. मग ते सतीशला बँकेत नोकरी लागल्याचा आनंद असो, किंवा संजयने जम्बो झेरॉक्सचे दुकान टाकल्याचे कौतुक असो, मिलिंदला कुटुंबातील पहिला इंजिनियर झाल्याचे असो किंवा नितीनला बँकेत नोकरी लागण्याचे असो. हेच माझे बाबा जेव्हा लताच्या लग्नात वरातीला धाय मोकलून रडताना बघितले तेव्हा समजत नसताना देखील माझ्या मनात कालवाकालव झाली होती. या सर्वांना त्यांचे बाबाकाका कायम लक्ष्यात राहतील.
कुणाचेही लग्न समारंभ असो किंवा वैकुंठगमन असो कायम माझे बाबा हिरीरीने समोर असायचे, त्यांनीच मला शेवटच्या अंत्यविधी क्रिया कश्या कराव्यात हे शिकवले. सेवानिवृत्त क्लब मध्ये आपल्या सहकाऱ्यांना मदत करणे, सामाजिक कामात लक्ष देणे, सचोटीने वागणे ह्याचे बाळकडू नेहमीच मला मिळत गेले. त्यांनी कधी तोंडभरून कौतुक करताना जरी नाही दाखवले तरी त्यांची प्रेम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यांनी मुलांसाठी आणि कल्याणीसाठी केलेली बचत एव्हाना फळे देण्यास सुरू झाली आहे. कल्याणीला निक्षून सांगायचे मुलांसाठी साठवलेले पैसे कधीही खर्च करायचे नाही.
संजयच्या अचानक जाण्याने त्यांना झालेला विलक्षण त्रास मी बघितला होता. माझ्या कोविडच्या जीवघेण्या आजारात जेवढी कल्याणी खंबीरपणे उभी राहिली तेवढेच माझे बाबा देखील ठामपणे माझ्या मागे उभे होते. संजय गेल्यानंतर ओंकार इंजिनिअर झाला आणि नोकरीला लागला हे पाहून त्यांना भावनाविवश होताना आम्ही बघितले. अमय आणि अथर्व दोघांनी इंजिनीअर कॉलेज मध्ये अडमिशन घेतल्याचे त्यांना विशेष कौतुक होते. त्यांना आमच्या पूर्णेशचे लग्न बघायचे होते त्यासाठी तर इतके उत्साहित होते की त्याच दरम्यान घरात छोटासा अपघात झाल्यावर देखील पूर्णेशच्या लग्नाचा धोशा कायम असायचा. शेवटी लग्नाला कसेबसे हजर झाले. अनघा आणि संपदाचे लग्न हे त्यांच्या यादीतले पुढचे कार्य होते.
गेल्या वर्षात माझे बाबा पुष्कळसे खचले होते, खुप भावनिक झाले होते, थोड्याश्या गोष्टींवरून, जुन्या आठवणींवरून लगेच भावुक व्हायचे. कायम आईच्या फोटोकडे बघत राहायचे. माझे पुढे कसे होईल याची कायम त्यांना चिंता असायची. अगदी पद्धतशीररित्या हळूहळू त्यांनी बँकेचे, पोस्टाचे व्यवहार मला आवर्जून शिकवले जणू काही त्यांना चाहूल लागली होती. कल्याणीने सून असून देखील अगदी मुलीला लाजवेल इतकी त्यांची शुश्रूषा केली. आई २००६ मध्ये गेल्यानंतर कल्याणीने एकटीने सगळ्यांचा सांभाळ कुठलीही तक्रार न करता अगदी नेटाने केला. असे माझे बाबा, आमच्याकडे बघताना त्यांना कितीतरी वेळा भावनाविवश होऊन रडताना मी बघितले आहे. अखेर ७ तारखेला नियतीने घाला घातला, ९० वर्षाचे थकलेले शरीर कुठलीही व्याधी नसताना ईश्वरचरणी लीन झाले. जाण्यापूर्वी त्यांनी माझ्याकडे टाकलेला कटाक्ष आणि हळूवार मिटलेले डोळे बघून मला अजूनही आतून पिळवटून टाकतं. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी मी कित्येक नातेवाईकांना बोलताना ऐकले की बाबाकाकांचा काय दरारा होता. सगळ्यांचे बाबाकाका गेले आणि एक पर्व संपलं. आईबाबांच्या या सर्व आठवणी कायम सोबत राहतील. वयाचे ९० वर्ष एक अजातशत्रू व्यक्तिमत्व, संपूर्ण निरोगी आयुष्य ते ज्या धडाडीने जगले त्या जगण्याला माझा सलाम...
त्यांच्याच पावलांवर चालण्याचा माझा कायम प्रयत्न असेल हीच माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
जयंत अलोणी