RiGhTcLiCk

मराठी कॉर्नर सभासद

Sunday, February 19, 2023

विवाह संस्कार

 

विवाह संस्कार

हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या एकूण १६ संस्कारांपैकी पंधरावा संस्कार म्हणजे विवाह संस्कार.  १६ संस्कारात पहिला संस्कार गर्भधारणा आणि सोळावा संस्कार अंत्यसंस्कार प्रामुख्याने मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा प्रभावी विकास आणि संवर्धन करण्यासाठी तसेच त्याच्यातल्या दोषांचे निराकरण करण्यासाठी हे १६ संस्कार महत्वाची भूमिका निभावतात. माणसाच्या सर्वांगीण तसेच व्यक्तिगत जीवनाला संस्कारित करण्यासाठी त्याच्या कल्याणासाठी ह्या संस्काराचे महत्व आहे. विवाह संस्कार नंतर सोळावा संस्कार म्हणजे थेट अंत्यसंस्कार, कारण विवाहानंतर सगळे संस्कार पुन:श्च गर्भधारणा संस्कारापासून सुरु होतात. बोलीभाषेत बोलायचे म्हटल्यास अंत्यसंस्कार हा एकमेव संस्कार आहे जो निवडीचा अधिकार मनुष्याला नाही परंतु इतर १५ संस्कार निवडण्याचे अधिकार प्रत्येकाला आहेत. 

आज जगात वायुवेगाने घटना घडत आहे, अख्खं जग अत्यंत वेगाने समोर जात आहे त्यात माणुसकी, प्रेम, भावना आणि संस्काराकडे थोडं दुर्लक्ष होऊन भौतिक सुखाकडे जग आकर्षित झाले आहे. एकीकडे हिंदू धर्मावर वाढते अत्याचार याच्या बातम्या पसरत आहेत तर दुसरीकडे भारताला हिंदू राष्ट्राकडे नेण्यास काही मंडळी सरसावली आहे.  आज २१ व्या शतकात विवाह संस्कारावर बोलणे म्हणजे एकवेळ हास्यास्पद वाटेल परंतु त्याची किती जास्त गरज आहे हे लेखाअंती प्रचीती येईल याची आशा आहे. असो.

सध्याच्या धकाधकीच्या काळात “मी आणि माझे” ह्यातच प्रत्येकजण गुरफटलेला आहे. “मी आणि माझे अधिकार” ह्या वर्तुळात प्रत्येकजण मग तो पुरुष असो अथवा स्त्री वावरताहेत. मग हळूहळू लग्नसंस्था मोडीत निघण्यासाठी हाच “मी” पणा कारणीभूत ठरत आहे. न्यायालयात घटस्फोटाची वाढलेली प्रकरणे पाहून आजकाल आश्चर्य वाटत नाही परंतु कीव करावीशी वाटते कि ह्या विवाहित जोडप्याला लग्न संस्था कळलीच नाही कि काय असे वाटायला लागले आहे. संस्कार देणे किंवा ते मनावर बिंबवणे म्हणजे काही खायचे काम नाही किंवा कुठला शॉर्ट टर्म कोर्स नाही तर संस्कारीत होणे हा एक साधनेचा भाग आहे. ह्यात संस्कार करणारा जर सुसंस्कारित नसेल तर मग सगळंच अवघड आहे.

विवाह संस्कार म्हणजेच विवाह किंवा लग्न. विवाह म्हटला कि दोन व्यक्ती, दोन कुटुंब आलीत. त्यासाठी सर्वसाधारणपणे तो मुलगा असो किंवा मुलगी ह्यांच्या मनावर सर्व संस्कार बिंबविताना त्यांना प्रत्येक संस्काराचे महत्व सांगायला हवे. आई आणि वडील ह्यामध्ये आईची भूमिका जास्त जवळची मानली जाते कारण मुलगा असो किंवा मुलगी हि आईच्या सानिध्यात जास्त असते. आपले अपत्य हळूहळू मोठे होत असताना त्याच्यातली समज, त्याचे विचार, त्याच्यात होणारे बदल त्यावर वेळीच दुरुस्ती पालकच करू शकतात त्यासाठी वेगळ्या संस्कार वर्गाला जाण्याची गरज नसते. शैक्षणिक वय पार पाडत असताना पाल्याला कदाचित समाजाचे व्यवहार कळत नसतील तरी त्याची स्वत:ची एक भूमिका ठरलेली असते आणि त्यात पालकांचा विशेष वाटा असतो. एकदा का शैक्षणिक सत्र पूर्ण करून पाल्याने आयुष्याच्या वाटेवर मार्गक्रमण करीत असताना लागलेले धक्के, टोणपे खात्ताना पालकांनी केलेल्या संस्काराची शिदोरी त्याच्या कामी येते आणि तीच त्याला त्यातून सहीसलामत बाहेर काढते.

पूर्वी लग्न हे मुलगा आणि मुलगी ह्यांच्या पत्रिका, त्यांची घराणी, त्यांचे स्थैर्य आणि समाजातील स्थान हे बघून करण्यात येत आणि त्यात बहुतांशी म्हणजे ९५% लग्न आणि त्यांचे संसार देखील निर्विघ्न होत असे. परंतु २१ व्या शतकाच्या पूर्वाधात मुलामुलींची लग्न हि एक मोठी समस्या पुढे येऊन उभी राहिली आहे.  आता एकमेकांचे घराणे बघण्यापेक्षा एकमेकाचे पॅकेज बघून लग्न ठरविली जातात.  पत्रिका बघून लग्न करणे ह्याला थोतांड म्हटल्या जाते. एरवी ज्योतिष्याकडे हात पसरून भविष्य जाणून घेणारी मंडळी पत्रिका बघायची म्हटल्यास नाक मुरडायला लागली आहेत. एवढेच नाही तर प्रेमविवाह टिकत नाहीत का ? किंवा इतर धर्मात आणि समाजात काय पत्रिका बघून लग्न करतात का ? त्यांची टिकत नाही का ? ह्यावर भले मोठे लेक्चर दिल्या जाते. वास्तविकता फार भयाण आहे. इतक्यात वधूवर सूचक मंडळे चांगलीच फोफावली आहेत. वधू वर सूचक मंडळाची एक जाहिरात होती त्याचे शीर्षक होते “आमच्याकडची लग्ने टिकतात”.

आजकाल ठामपणे कुठले लग्न टिकेल हे कुणीच सांगू शकत नाही. न्यायालयात अगदीच तकलादू किंवा फालतू कारणांनी घटस्फोटाची प्रकरणे दाखल होऊ लागली आहेत आणि त्याचा न्यायनिवाडा करणे हे देखील न्यायालयाची डोकेदुखी झाली आहे. सध्या सोशल मिडिया मुळे आणि असंगती संग दोषेन ह्या कारणांनी देखील घटस्फोटाचे प्रमाण पराकोटीचे वाढले आहे. ह्यावर उपाययोजना काय ते भलेभल्यांना माहित नाही. एकंदरीत काय तर सगळाच आनंदीआनंद आहे.

आपल्या समाजात मोबाईल, सोशल मिडिया आणि टीव्ही मालिका हे साधारण २०१० पासून प्रकर्षाने वाढले. त्यानंतर इतक्या प्रकारचे मोबाईल ऍपस आलेत कि केवळ बोटांच्या हालचालीवर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. ह्यात भर पडली अनाहूत सल्लेगारांची. हिंदू धर्मात विवाह किंवा लग्न हे जन्मोजन्मीचे नाते आहे असे नमूद केले आहे तरी पण घटस्फोटीतांची संख्या आश्चर्यचकित करणारी आहे. गेल्या २५ वर्षाच्या काळात घटस्फोटाची प्रकरणे ऐकून आणि वाचून त्यातील कारणे थक्क करणारी आहेत. आताशा न्यायालयाने देखील त्यांच्या न्यायनिवाड्यात कायद्याचा गैरवापर आणि त्याची दखल घेण्यास सुरुवात केली आहे. सोशल मिडिया आणि टीव्ही मालिका वर आजकाल सर्रास अश्या गोष्टी दाखविल्या जात आहेत त्या जोडप्यांच्या विवादात खतपाणी घालण्याचे काम करीत आहे. ह्यातून वेळीच सावध झाले नाहीत तर लग्न संस्था कोलमडून पडायला वेळ लागणार नाही आणि असे झाले तर त्याचे वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक आणि राष्ट्रीय नुकसान निश्चित आहे.

प्रत्येकाने थोडासा विचार केला तर ह्या सर्व गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. अगदी सुरुवातीपासूनच विचार करायला हवा. इच्छा असेल तर त्यातून मार्ग हा नक्कीच सापडणार.  प्रत्येक आईवडिलांनी हा विचार आवर्जून करावा जेणेकरून त्यांची पुढील पिढी हि त्यांच्या संसाराच्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवतील आणि यशस्वीरित्या पार पाडतील.  प्रत्येक आईवडिलांनी त्यांचे पाल्य मग तो मुलगा असो किंवा मुलगी यांच्यासोबत तार्किक संवाद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, काय बरोबर काय चूक हे वेळीच सांगणे अत्यंत गरजेचे आहे. लग्नसंबंधात सहवास, विश्वास आणि आदर ह्या तीन बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. लग्नाच्या वयापर्यंत जर मुलगा किंवा मुलगी यांना त्यांच्या पालकांकडून ह्या तीन बाबींवर बाळकडू दिले गेले नाहीत तर तो मुलगा किंवा मुलगी हे लग्न करण्यास मुळात तयारच नाही असे म्हणायला हवे. मुलगा किंवा मुलगी जेव्हा मोठे होत असतात तेव्हा ते सभोवतालच्या घडणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करतात आणि त्या नुसार काय चूक आणि काय बरोबर हे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. त्यामुळे पालकांची जबाबदारी खूप मोठी आहे, त्यांनी जे बरोबर आहे त्याचेच उदाहरण आपल्या पाल्यासमोर ठेवावयास हवे. पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये मग दोन मुली असो किंवा एक मुलगा एक मुलगी असो किंवा दोन्ही मुले असोत, कधीही भेदभाव किंवा तुलना करू नये. एक आवडता एक नावडता हि संकल्पना फार खोलवर मनावर रुजते. पर्यायाने त्यांची लग्ने झाल्यावर हा भेदभाव किंवा तुलना हि प्रकर्षाने जोपासल्या जाते. मग एक सून लाडकी आणि दुसरी सून दोडकी होते, एक जावई खूप लाडाचा आणि दुसरा जावई बिनकामाचा होतो. अशी तुलना किंवा भेदभाव केल्यास दुरावा वाढत जातो आणि त्याचे रुपांतर रोजच्या कटकटीमध्ये होते. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना सारखेच प्रेम करतात त्यांचे सारखे लाड करतात पण अभावितपणे तुलना किंवा भेदभाव अजाणतेपणी होऊन जातो त्याची सल कायम दर्शनी भागात राहते.

आजकाल शेअरिंगचे आणि स्पेस देण्याचे फॅड खूप वाढले आहे. महाविद्यालयात सहशिक्षण असल्यामुळे साहजिक प्रत्येकाला मित्र मैत्रिणी असतात. मग जे पालकांसोबत संवाद करू शकत नाही ते पर्यायाने आपल्या मित्र मैत्रिणी सोबत शेअरिंग करतात. ह्यात त्यांना एक कळत नाही कि ज्या गोष्टी आपण प्रामुख्याने टाळायला हव्या त्याच गोष्टी मित्र किंवा मैत्रिणीला सांगितल्या जातात. मग ह्यातून गुपिते तयार होतात आणि लग्न झाल्यानंतर ह्या गुपितांचे ओझे वाढते. लग्न ठरल्यानंतर आणि होण्यापूर्वी काही इच्छुक जोडपे संवादात इतके जास्त मश्गुल असतात कि नको त्या गोष्टी ते शेअरिंग करतात आणि एकदा का लग्न झाले कि मग त्यांच्यात बोलण्यासारखे काहीच उरत नाही मग गाठीशी असलेल्या माहितीवरून एकमेकांची उणीदुणी काढली जातात आणि वाद विकोपाला पोहोचतात.

एवढ्यावरच हे थांबत नाही, तर लग्न झाल्यावर मुलगा आणि मुलगी म्हणजे नवरा आणि बायको एकमेकांसोबत संवाद कमी पण इतरांशी संवाद जास्ती करायला लागतात ज्यामुळे काय होते ज्या गोष्टी दोघात राहायला हव्या त्या सगळ्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना कळतात आणि हे लोक अगदीच दबा धरून बसलेलेच असतात मग तेल ओतून भडका उडविण्याचे सोप्पे काम बाकी असते ते देखील अनायसे पूर्णत्वास जाते.

असले शेअरिंग करताना ह्या जोडप्याला एक कळत नाही कि ते आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना किंवा आपल्या आईवडिलांना नको त्या गोष्टी सांगून आपल्याच नात्यातली आणि आपल्याच घरातली फट दुसऱ्याला दाखवत आहोत आणि अशी फट दिसल्यावर त्याचे भगदाड पडायला फार काळ लागत नाही. बरे शेअरिंग करताना एक लक्षात येते कि माझा नवरा, माझी बायको, माझा दीर, माझी नणंद, माझी सासू, माझा सासरा कसे आहेत त्याचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन सांगितल्या जाते मग दुसरी ऐकणारी बाजू देखील कमी थोडीच असते, ती देखील शांत करण्याऐवजी आपल्या वकुबाने त्यात तेल ओतण्याचे काम करते.  एक प्रामुख्याने लक्षात येते कि असे सल्लेगार कधीही आपल्या घरातला अंधार त्या चर्चेत कधीच आणीत नाही परंतु सल्ला देताना पाणी टाकण्याऐवजी ती आग कशी भडकेल यावर जास्त जोर देत असतात. पर्यायाने आपल्याच घरावर वरवंटा फिरविण्याचे काम केले जाते आणि सरतेशेवटी हातात काहीच उरत नाही. असले शेअरिंग करण्यापेक्षा ज्याच्या सोबत तक्रार आहे त्याचेसोबतच सुसंवाद साधून चर्चेतून मार्ग काढावा, परंतु ज्यांचा आपल्या संसारात दुरान्वयाने संबंध नसतो अश्या मित्र मैत्रिणी, आईवडिल आणि नातेवाईकांसोबत असे घरातले विषय शेअरिंग करून स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेण्याचे काम केल्या जाते.

विवाहित जोडप्याच्या संसारिक आयुष्यात कुणाच्याही पालकांचा आणि मित्र मैत्रिणींचा हस्तक्षेप नसावा. तसेच विवाहित जोडप्याने देखील अगदीच आवश्यक असल्यास आईवडिलांना विश्वासात घेऊन गोष्टी शेअर कराव्या. परंतु असे लक्षात येते कि दिवस उजाडला कि मावळेपर्यंत मोबाईल घेऊन घरातल्या प्रत्येक गोष्टी आईवडिलांना आणि मित्र मैत्रिणींना शेअर केल्या जातात आणि एक सहानुभूती मिळविण्याचा आटापिटा केल्या जातो, त्यातून साध्य काहीच होत नाही उलटपक्षी विवाहित जोडप्यात दुरावा निर्माण करण्याचे कार्य निरंतर होत राहते.

विवाहित जोडप्यांमध्ये आजकाल तुलना करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आईवडिलांनी अजाणतेपणी केलेला भेदभाव आणि मित्रमैत्रिणीचे आर्थिक स्थान ह्यावर तुलना करून सगळा रोष विवाहित जोडपे एकमेकांवर काढतात, वास्तविक त्यांना जाणीव नसते कि प्रत्येक व्यक्ती हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने आपली ओंजळी भरून घेत असतो. प्रत्येकाच्या दिव्याखाली अंधार असतो, प्रत्येकाच्या डोक्यावर प्रापंचिक जबाबदाऱ्या असतातच परंतु ते त्याचा कधीच बभ्रा करीत नाही तर शांतपणे विचार करून त्यातून यशस्वीपणे घोडदौड करीत असतात. काहींना वाटते कि आपल्या पार्टनरला खूप मोठ्ठा पैसा मिळाला पाहिजे, खूप मोठ्ठे घर असले पाहिजे, खूप कमीत कमी जबाबदारी असायला हव्या, आपला पार्टनर आपल्या मुठीत असला पाहिजे, उठ म्हटलं कि उठ आणि बस म्हटलं कि बसला पाहिजे. निश्चितच चांगले विचार आहेत, पण खूप पैसा मिळाला कि जबाबदारी वाढते आणि मग घरातला वेळ हा प्रामुख्याने ऑफिसमध्ये द्यावा लागतो ह्याची जाणीव विचार करताना होत नाही. खूप मोठ्ठे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असतेच ते असायला पण पाहिजे पण त्यासाठी आधी आपण कश्या घरातून आलो याचे देखील भान विचार करताना असायला हवे.

एका पिढीतून दुसऱ्या पिढीला जो विचारांचा बटवा द्यायला हवा तो नेमका मिळत नाही आणि भौतिकदृष्ट्या सर्व विचार करून संसाराची गाडी अधोगतीला चालली आहे हे नक्की. अँपल कंपनीचा मालक आणि नंतरचा सी.ई.ओ. स्टीव जॉब्स हा कर्करोगाने वयाच्या ५५ व्या वर्षी अकस्मात गेला.  त्याला जेव्हा कळले कि त्याला स्वादुपिंडाच्या असाध्य अश्या कर्करोगाने ग्रासले आहे तेव्हा त्याला जाणीव झाली, तो म्हणाला कि मृत्यू हा जीवनाचा एकच सर्वोत्तम शोध आहे. जर तुम्ही प्रत्येक दिवस तुमचा शेवटचा दिवस असल्यासारखे जगलात, तर तुम्ही नक्कीच बरोबर असता. रोज सकाळी उठल्यावर आरश्यात बघा आणि स्वत:ला विचार कि आज माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असता तर मी जे करणार आहे ते मला करायचे आहे   का ? आज ते करू का ? असा विचार केला कि अनेक विचार आणि कृतीची निरुपयोगीता लक्षात येते. भलत्याच गोष्टींना महत्व देणे, पैसा, वास्तू आणि वस्तू यांचा संग्रह करणे व मानापमान या गोष्टींच्या मागे वेळ घालविण्याची निरर्थकता कळते. आपल्या नात्यांचे आणि त्यांना वेळ देण्याचे महत्व जाणवू लागते. मृत्यू हे आपल्या सर्वांचे गंतव्य स्थान आहे. त्यातून कोणीही सुटलेले नाही. तेव्हा सगळ्यांशी चांगले वागावे, उगीच कुणाला दुखवू नये, स्वत:ला श्रेष्ठ व दुसऱ्याला कमी लेखू नये. तुमचा वेळ मर्यादित आहे, त्यामुळे दुसऱ्याचे जीवन जगण्यात वेळ वाया घालवू नका. म्हणजे देखाव्यासाठी दुसऱ्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करण्यात वेळ घालवू नका, इतरांच्या मतांच्या गोंगाटात तुमचा स्वत:चा आवाज बुडू देऊ नका. 

स्टीव जॉब्स चे ध्येय पैसा कमावणे हेच होते, पण त्याने कबुल केले कि जेव्हा त्याने खूप पैसा कमविला तेव्हा त्याच्या लक्षात आले कि, आयुष्यात खूप पैसा कमाविल्यामुळे वैयक्तिक गरजा ह्यात काहीच फरक पडला नाही, जेवढी जागा आधी लागायची तेवढीच नंतर देखील लागायची, आहार देखील तेवढाच राहिला पण ह्या हव्यासापोटी मानसिक शांती भंग झाली.

आज वैवाहिक जीवनात मन:शांती हीच महत्वाची आहे. ती मिळविण्यासाठी दोघांनी शांतपणे विचार करायला हवा, एकमेकांना पुरेसे समजून घ्यायला हवे, एकमेकांना सहवास द्यायला हवा, एकमेकांचा आदर करायला हवा, एकमेकाच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवायला हवा, पत्रिकेत गुण जुळतात म्हणून लग्न टिकत नाही तर ते टिकतात आपल्या जोडीदाराच्या गुणांना गोंजारून आणि अवगुणांना दुर्लक्षित करून. स्वत:चा संसार हा विचारपूर्वक आणि एकमेकांवरच्या विश्वासाने आणि आदराने यशस्वी करावा. इतरांच्या अनुभवातून त्यांनी केलेल्या चुका प्रामुख्याने आपल्या संसारात वर्ज्य करून स्वत:च्या संसाराचा गाढा ओढावा, दुसऱ्यांच्या अनुभवावरून स्वत:चे जीवन जगणे प्रामुख्याने टाळावे मग संसारातली गोडी चाखण्याची मजा काही औरच आहे ह्याचा आनंद घेता येईल.

शुभम भवतु

शब्दांकन : जयंत अलोणी