न मातुः परदैवतम्
हे ब्रीदवाक्य
नान्नोदकसमं दानं तिथिर्नैकादशी समा।
न गायत्र्याः परो मन्त्रः
न मातुः परदैवतम्॥
या संस्कृत श्लोकातून घेतले आहे, याचा अर्थ
धान्य आणि पाण्यापेक्षा श्रेष्ठ भिक्षा नाही; एकादशी पेक्षा श्रेष्ठ कोणताही दिवस (तिथी) नाही. गायत्री मंत्रापेक्षा श्रेष्ठ कोणताही मंत्र नाही आणि आईपेक्षा श्रेष्ठ कुठलाही देव नाही....
खरंच न मातुः परदैवतम्
आपल्या अपत्याला जन्म देताना जिचा पुनर्जन्म होतो तिच्यापेक्षा कुठलाही देव श्रेष्ठ नाहीच..
असंख्य त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून परमेश्वराने घडवलेली आई, तिच्या कर्तुत्वाला मोल नाही, तिच्या प्रत्येक गोष्टीत प्रेम, वात्सल्य, ममत्व, करुणा.. आपल्या पिल्लाला उभं करण्यात जिच्या आयुष्याची चंदना सारखी झिज होते त्या त्यागाचे मोल नाही.. प्रसंगानुरूप कधी वार करणारी तलवार तर कधी आपल्या पिल्लाला वाचवणारी ढाल... वडिलांच्या धाकासमोर पाठीशी घालणारी प्रेमळ आई, संस्काराचे बीज मनावर रुजवणारी संयमी आई, क्षुल्लक चुकांवर पांघरूण घालणारी वात्सल्यमुर्ती आई, तर प्रसंगी डोळे वटारून पाठीत धपाटा घालणारी निग्रही आई, तर कधी आपल्या तोंडातला घास आपल्या पिल्लाला भरवणारी करुणामयी आई, जितकी तिची रूपे तेवढं तिला समजणं अवघड.. आई म्हटल्यावर व्याकरणातले सगळे संदर्भ, नियम बाजूला सारून आपलेपणा जपणारी आई, नुसतं आई म्हटल्यावर डोळ्यातून घळाघळा अश्रूंचा बांध फुटावा अश्या आईचे ऋण एकच काय जन्मोजन्मी फेडता येणार नाही..
आपल्या पाल्याला घडविताना जिचा प्रत्येक क्षण अन क्षण सदैव देऊनच जातो तरी तिची ओंजळ यत्किंचितही ही कमी होत नाही, तिच्यापुढे कर्णाची दानशूरता फिकी पडावी असे तिचे दातृत्च, अशी आई परमेश्वराने भरभरून घडविली आहे.. आई समजायला जन्म अपुरा पडेल, तिचे ममत्व वाचायला शब्दसंपदा कमी पडते.. मृत्यू अटळ आहे, प्रत्येकाला त्याला सामोरे जावे लागते, पण त्याच वेळी आई अगदी थोडी, जराशी कळायला लागते, तो पर्यंत उशीर झालेला असतो, प्रत्येक पाल्य स्वतः आई किंवा बाप झाल्याशिवाय आई कळतंच नाही. प्रत्येकाला देवाने बुध्दी दिली असते पण ती असून सुध्दा आई कळतंच नाही हे खरे दुर्दैव.
आईच्या मनात हिमालयाची उतुंगता असते तसेच सागराची खोली देखील, कुठे ही सुर मारण्याचा प्रयत्न करा ना शिखर गाठता येते ना तळ..
उर्दू कवी मुन्नवर राणा आईवर लिहिताना म्हणतात, "मेरी ख़्वाहिश है कि मैं फिर से फ़रिश्ता हो जाऊँ माँ से इस तरह लिपट जाऊँ कि बच्चा हो जाऊँ"...खरंच ना, कितीही मोठ्ठा झालो तरी आईच्या कुशीत सर्व नकारात्मक प्रवृत्ती पासून निवांत पडून राहण्यासारखे दुसरे सुख नाही..
आईच्या नुसत्या आठवणीने हृदय पिळवटून जाते, सकाळच्या नितळ उन्हात ऊब देणारी आई, माध्यान्हीला शीतलता देते, तर रात्रीच्या गुलाबी थंडीत मायेने डोक्यावरून हात फिरवत सगळा क्षीण क्षणार्धात घालविते..
हळूहळू आई वयाने खचते तरीपण तिचे डोळे तिच्या पिल्लाला दूर आकाशात उंच भरारी घेत पाहताना आसुसलेले असतात, आयुष्यभर काबाडकष्ट करून वाढविलेल्या पिल्लाला यशस्वी बघताना डोळे पाणावलेले असतात, तिच्या मनाची झालेली झीज समजतच नाही, तिच्या वार्धक्याने आलेल्या अशक्तपणाचे आकलन होत नाही, आणि जेव्हा अंतिम सत्याला ती हसतहसत सामोरी जाते तेव्हा तिच्या आठवणींचा महापूर मनाचे गाव वाहून नेतो, पार उध्वस्त करून टाकतो.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, अगदी समर्पक... हे सगळं आई जेव्हा नसते तेव्हा आठवायला लागतं..
मग कायम मनात एक सल डोकावत राहते की आपल्या आप्पलपोटी स्वभावामुळे स्वतःच्या उत्कर्षाच्या काळात आईचा त्याग, तिचे समर्पण याची जरासुद्धा दखल घेण्याचे औदार्य आपल्यात नव्हते, तिने जे केले ते तिचे कर्तव्य होते अश्या खुज्या मानसिकतेचा मुखवटा आपल्या चेहऱ्यावर असतो, आपल्या कातडीचे पादत्राण जरी करून आईला घातले तरी तिच्या आईपणाची परतफेड होऊ शकणार नाही.. अशी ही आई... खरंच तिच्या पेक्षा कुठलाही देव श्रेष्ठ नाही..
न मातुः परदैवतम्
Friday, October 21, 2022
न मातुः परदैवतम्
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment